शिराळा,ता.११:वेळ मध्यरात्री सव्वा दोनची.सारा गाव शांत व गाढ झोपेत होता. झाडावर फक्त पक्षांचीच किलबिल सुरु.त्यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार बाजीराव भोसले व त्यांचे सहकारी अनुज पाटील यांचे रात्रीसाठी फिरणारे गस्ती पथक निगडी येथील गावात दाखल झाले.गावातून फेरफटका मारत असताना अचानक एका घरासमोर ठेवलेल्या लाकडाच्या जळणास आग लागल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. ती आग वाढत असल्याने काहीवेळात त्या घराला लागू शकते याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता पटकन त्या घरातील व आजूबाजूच्या लोकांना जागे करून आग विझवली.अन पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
निगडी (ता.शिराळा) येथे शिराळा पोलिसांचे रात्रीसाठी फिरणारे गस्ती पथक नेहमी प्रमाणे फिरत फिरत मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास गावात गेले होते.त्यावेळी शोभा विलास भालेकर यांच्या घरासमोर ठेवलेल्या जळणास आग लागली होती. ती आग गस्त घालणाऱ्या पोलीस हवलदार बाजीराव भोसले व त्यांचे सहकारी अनुज पाटील यांच्या नजरेस पडली.आग वाढून घराला लागण्याची दाट शक्यता होती. त्या घराच्या शेजारी आणखी दोन घरे होती. त्यामुळे प्रसंगावधान राखून हवलदार भोसले व पाटील यांनी त्या घराच्या आजूबाजूच्या लोकांना उठवून त्यांच्या घरातील पाणी आणून आग वेळीच विझवण्यात आली. गावातील अनेक तरुण मुंबईला आहेत.त्यामुळे गावाकडे वयोवृद्ध व महिलांची संख्या जास्त आहे. शोभा यांचे पती व मुल मुंबईला असल्याने त्या आणि सासू अशा दोघीच होत्या.
शेजारच्या घरात ही एक वयोवृद्ध पुरुष व इतर महिला होत्या.त्यामुळे पोलीस व महिलांनी आग घरातील पाणी ओतून आटोक्यात आणल्याने संभाव्य होणारी हानी टळली.या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळेत भालेकर कुटुंबियांना केलेल्या मदती बद्दल भालेकर कुटुंबीय व ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले. त्यांच्या हवलदार बाजीराव भोसले व अनुज पाटील यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी ही त्यांचे कौतुक केले आहे.
0 Comments